पुणे : शेतकरी मान्सूनकडे (Monsoon) डोळे लावून असतात. कारण मान्सूनवरच पिकंपाणी अवलंबून असते. मान्सून वेळेवर आला आणि नियमित बरसला तर शेतकर्यांना फायदा होतो. मान्सूनवर केवळ शेतकरीच नव्हे तर अनेक क्षेत्रांचे गणित अवलंबून असते. मान्सूनवर देशाची अर्थव्यवस्था अवलंबून असते. याही पलिकडे जावून भारतातील मान्सून केवळ भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी महत्वाचा असतो.
मान्सूनचा पाऊस चांगला बरसला तर खरीप हंगामात चांगले उत्पादन होतेच शिवाय याचा फायदा रब्बी हंगामातील पिकांना देखील होतो. कारण जर पाऊस चांगला झाला असेल तर जलाशयांमध्ये व जमीनीखालील पाण्याची पातळी वाढते. यामुळे मान्सूनवर कृषि साखळी व अर्थव्यवस्थेचे गणित फिरत असते. यंदा चिंतेचे कारण म्हणजे, १५ जूनपर्यंत अत्यंत कमी पाऊस झालेला आहे. याचा विपरित परिणात खरीपाच्या उत्पादनावर होण्याची दाट शक्यता आहे. खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादनात थोडीशी घट झाली तरी सरकारला निर्यात निर्बंध लादण्यास भाग पाडू शकते. यामुळे जागतिक अन्नधान्याची साखळी विस्कळीत होईल.
भारतातील खरीप हंगामातील मुख्य पीक असलेल्या धानाच्या उत्पादनावर कोणताही विपरीत परिणाम झाल्यास देशातील अन्नपुरवठा आणि महागाईची परिस्थिती आणखी वाढेल. जर भारतातील खरीप पिकांचे उत्पादन कमी असेल, विशेषतः धानाचे, तर जागतिक अन्नधान्याच्या किमती आणखी वाढू शकतात. तांदूळ आणि गव्हाच्या आकडेवारीवरून असे दिसून येते की गव्हाच्या किमती सर्वकालीन उच्चांकावर आहेत, परंतु तांदळाच्या किमती फारश्या वाढलेल्या नाहीत. परंतू तांदळाच्या किमती वाढल्याने जागतिक अन्नधान्याच्या किमतींसाठी आणखी प्रतिकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते.
यंदा पाऊस कमी होण्याची शक्यता लक्षात घेता. रब्बी हंगामातील कृषी उत्पादन, विशेषतः गव्हाचे उत्पादन भारतात लक्षणीयरीत्या कमी होण्याची अपेक्षा आहे. १६ फेब्रुवारी २०२१-२२ रोजी कृषी मंत्रालयाने जारी केलेल्या दुसर्या आगाऊ अंदाजानुसार, देशात गव्हाचे उत्पादन १११.३ दशलक्ष टन असल्याचा अंदाज आहे. १९ मे रोजी जारी करण्यात आलेल्या तिसर्या आगाऊ अंदाजानुसार, हा अंदाज १०६.४ दशलक्ष टन इतका कमी करण्यात आला आहे. युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ अॅग्रिकल्चरच्या २५ मे च्या अहवालात २०२१-२२ मध्ये भारताचे गव्हाचे उत्पादन ११० दशलक्ष टनांच्या अंदाजापेक्षा फक्त ९९ दशलक्ष टन राहण्याची अपेक्षा आहे.