पुणे : एकीकडे राज्यात उन्हाचा कडाका वाढत आहे तर दुसरीकडे अवकाळी पावसाचे संकट पुन्हा गडद झाले आहे. उद्यापासून म्हणजेच १८ एप्रिलपासून कोकणासह मध्य महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. तर दुसरीकडे मात्र विदर्भात उन्हाचे चटके कायम राहणार पारा 44 अंशावर पोहचला आहे. त्यामुळे उन्हाचे चटके आणखी लागणार आहेत. तर उर्वरित महाराष्ट्रात मात्र कमाल तापमान 42 अंशाच्या पुढे पोहोचल्याने उकाडा आणखी वाढला आहे.
कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे या भागामध्ये पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. या अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बळीराज्याने पावसामुळे नुकसान होऊ नये यासाठी आपल्या शेतीची आणि पिकांची काळजी घ्यावी. वेळीच त्यांनी उपाययोजना कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, शनिवारी सांगलीला अवकाळी पावासाने झोडपून काढले. सांगली, मिरज शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात अवकाळी पाऊस पडला. विजांच्या कडकडाटासह झालेल्या या पावसादरम्यान गारा सुद्धा पडल्या. अचानक आलेल्या पावसामुळे सांगलीकरांचे चांगलेच हाल झाले. या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे बळीराजा संकटात आला आहे. या पावसामुळे द्राक्ष आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे.