बीड : माजलगाव तालुक्यातील दोन गावच्या ग्रामपंचायतीच्या कारभारात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत गावातील काही तरुण जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषणाला बसले आहे. या आंदोलनाची चर्चा केवळ बीड जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यभरात होत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे, आंदोलनात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचेही चेहरे दिसत आहेत.
माजलगाव तालुक्यातील लोणगाव आणि नित्रुड येथील ग्रामपंचायती अंतर्गत झालेल्या ककथित भ्रष्टाचाराची चौकशी करावी आणि भ्रष्ट अधिकार्यावर कारवाई करावी या मागणीसाठी बीडच्या जिल्हा परिषद समोर उपोषण सुरु करण्यात आले आहे. मात्र प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने त्याचा निषेध म्हणून उपोषणकर्त्यांनी राज्यातील बड्या नेत्यांसह स्थानिक आमदारांचे मुखवटे घालून अनोख्या पध्दतीने निषेध करण्यास सुरुवात केली आहे. या अनोख्या आंदोलनामुळे बीड जिल्ह्यात एकच चर्चा होत आहे. जोपर्यंत भ्रष्ट अधिकार्यावर कारवाई होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला आहे.