औरंगाबाद : खरीप हंगामासाठी रासायनिक खते विक्रेत्यांना युरिया व मिश्रखते पुरवठा करताना उत्पादक व पुरवठादार कंपन्यांकडून इतर खतांची खरेदी करण्यासाठी सक्ती करण्यात आली आहे. विक्रेत्याची मागणी नसतानाही युरिया व मिश्रखतांसोबत इतर माल लिंकिंग पद्धतीने विक्रीसाठी विक्रेत्यास पुरविलेला आहे. यामुळे लिंकींगला केवळ शेतकरीच नव्हे तर विक्रेतेही कंटळले आहेत. यामुळे रासायनिक खते उत्पादक व पुरवठादार, प्रमुख अधिकारी तसेच ‘माफदा’च्या प्रमुख पदाधिकार्यांची तातडीने बैठक घ्यावी, असे विनंतीपत्र महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाईड्स सिड्स डीलर्स असोसिएशनने कृषी आयुक्त धीरजकुमार यांना दिले आहे.
प्रत्येक हंगामात शेतकर्यांकडून लिंकीगची ओरड होत असते. विक्रेते शेतकर्यांची आर्थिक लूट करतात, असा बहुसंख्य शेतकर्यांचा आरोप राहतो. हा आरोप यंदाच्या खरीप हंगामातही होत आहे. मात्र यावेळी शेतकर्यांसोबत विक्रेतेही लिंकीगच्या नावाने ओरडत आहेत. उत्पादक कंपन्यांना विक्रेत्यांना लिंकीग करण्यासाठी भाग पाडत आहेत. यामुळे विक्रेत्यांना शेतकर्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. लिंकिंगसाठी केवळ खते उत्पादक व पुरवठादार कंपन्या जबाबदार असल्याचे ‘माफदा’चे म्हणणे आहे.
या शिवाय कंपन्यांनी खरीप हंगामात रासायनिक खते विक्री केंद्रांत पोहोच पद्धतीने देण्यासाठी वाहतूक व हमालीची रक्कम आकारणी केली. त्यामुळे या खर्चासह येणारी किंमत, पॅकिंग एमआरपीपेक्षा जादा होत आहे. एमआरपी दराने विक्री करणे तोट्याचे व बेकायदेशीर असल्याने विक्रेत्यांच्या अडचणीमध्ये वाढ होत आहे. या अडचणी दूर करण्याबाबत जिल्हा संघटनांकडून ‘माफदा’कडे मागणी करण्यात आली आहे.
या आहेत ‘माफदा’च्या मागण्या
कंपन्यांकडून होणारी लिंकिंग बंद व्हावी.
युरिया, मिश्रखते व कॉम्प्लेक्स खतांचा पुरवठा ‘एफओआर’ पद्धतीने व्हावा.
विक्रेत्यांकडील वाहतूक व हमाली खर्च आकारणी बंद व्हावी
कॉम्प्लेक्स खतांवरील विक्री मार्जिन ८ टक्के द्यावे
रासायनिक खते वाहतुकीसाठी पुरेशा रेल्वे वॅगन उपलब्ध कराव्यात
रासायनिक खतपुरवठा सुरळीत व्हावा
रासायनिक खतांचे विक्री मार्जिन ६०० रुपये करावे.