Weather Alert | रत्नागिरी : राज्यात मान्सूनला जोरदार सुरुवात झाली आहे. कोकण किनारपट्टीवर मान्सूनचा जोर वाढण्यास पोषक वातावरण आहे. अशातच आता हवामान खात्याने आणखी एक इशारा दिला आहे. २९ जून २०२२ ते ०१ जुलै २०२२ या कालावधीमध्ये दक्षिण महाराष्ट्र व गोवा किनारा ठिकाणी ताशी ४०-५० कि.मी. ते ६० कि.मी. वेगाने वादळी वारे वाहण्याचा इशारा वर्तविण्यात आला आहे. ०२ जुलै पर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. तरी नागरिकांनी सावधानता व सुरक्षितता बाळगावी. मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जावू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
मुंबईत उद्या संध्याकाळपासून पावसाचा जोर वाढणार आहे. तसेच मुंबई, ठाणे पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर पुढील पुढील ३ ते ४ दिवस कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण किनारपट्टी भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने कोकणात चांगल्या पावसाची शक्यता आहे. उद्यापासून मुंबई, ठाण्याला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याकरता उद्यापासून पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
कुठे मुसळधार तर कुठे प्रतिक्षा
राज्यात पावसाने पुनरार्गमन झाले असले तरी सर्वकडे एकसारखा पाऊस झालेले नाही. सध्या राज्यात काही ठिकाणी पाऊस पडत आहेत. सध्या राज्यात काही ठिकाणीच चांगला पाऊस झाला आहे. मात्र, अद्याप अनेक ठिकाणी पावसाने दडी मारली आहे. त्यामुळं शेतकर्यांची चिंता वाढली आहे. असमाधानकारक पाऊस झाल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. गेल्या वर्षी राज्यात आजच्या घडीला सरासरी २७० मिलीमीटर पाऊस झाला होता. त्या तुलनेत यंदा मात्र केवळ १३४ मिलीमीटर पाऊस झाला आहे. गतवर्षी आतापर्यंत खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. यंदा मात्र खरीपाखालील क्षेत्रापैकी केवळ १३ टक्के म्हणजे २०.३० लाख हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. शेतकरी पेरणीसाठी पावसाची वाट बघत आहेत.