नाशिक : शेतीत रासायनिक खते व कीटकनाशकांचा वापर प्रमाणापेक्षा जास्त वाढल्याने आता त्याचे दुष्यपरिणाम आता जाणवू लागले आहेत. याचा परिणाम केवळ मानवी जीवनावरच नव्हे तर जमीनीच्या आरोग्यावर देखील होवू लागला आहे. परिणामी खर्च वाढूनही उत्पादनात घट होत आहे. यापार्श्वभूमीवर सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने विशेष योजना हाती घेतल्या आहेत. (Organic Farming Government Schemes)
सेंद्रिय शेती नैसर्गिक घटकांचा पुनर्वापर करुन केली जाणारी शेती होय. यात खत म्हणून शेण, गांडूळ खत, नोडेप-कंपोस्ट खत, पालापाचोळ्यापासून तयार केलेले खत, निळ्या-हिरव्या शेवाळासह अन्य घटकांचा प्रामुख्याने वापर केला जातो. कीडनाक म्हणून निंबोळी, लसूण, तंबाखू, गोमूत्र आदी सेंद्रिय पदार्थांच्या वापरावर भर दिला जातो. जमिनीतून पिकांसाठी घेतल्या जाणार्या अन्नद्रव्यांएवढी अन्नद्रव्ये जमिनीत जातील अशी व्यवस्था केली जाते. जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी सुकर अशा शेतीपूरक व्यवसायांना प्राधान्य. दिले जाते.
शेतीत पिकांची फेरपालट, मिश्रपीक पद्धत, द्विदल पिकांचा समावेश करुन तसेच नैसर्गिक साधनसंपत्तीचा साखळी पद्धतीने वापर करून जमिनीची उत्पादकता वाढवली जाते. सेंद्रिय शेतीमुळे जमिनीची सुपीकता टिकून राहते. शून्य किंवा कमीत कमी भांडवल लागणारी, स्थानिक साधनसामग्री, व कमी श्रमाच्या वापराची गरज असलेली ही शेती पद्धत आहे.