ऐकावेच तर नवलच! बारामतीकरांनी पिकविले पिवळे टरबूज; मंत्री जयंत पाटील म्हणाले…

- Advertisement -

मुंबई : टरबूज म्हटले की लाल रंगाचे रसाळ, पाणीदार फळ डोळ्यासमोर येते. त्यातही टरबूज जेवढे लाल तेवढा त्याचा गोडवा जास्त मानला जातो. मात्र कुणी पिवळ्या रंगाचे टरबूज तुम्हाला खायला दिले तर तुम्ही काय म्हणाल…मात्र ही किमया साध्य केली आहे, बारामती तालुक्यातील मळद गावचे प्रगतिशील शेतकरी प्रल्हाद गुलाबराव वरे यांनी!

प्रल्हाद वरे हे गेल्या चार वर्षांपासून पिवळ्या टरबूजचे उत्पादन घेत आहेत. जास्त गर आणि चवीला गोड असणार्‍या या कलिंगडाच्या वाढीसाठीही अडीच महिन्याचाच कालावधी लागतो. शिवाय उत्पादन प्रक्रिया ही हिरव्या कलिंगडाप्रमाणेच आहे. याला दर देखील जास्त मिळतो. यंदा पिवळ्या टरबूजची राज्यभरात चर्चा होण्याचे कारण म्हणजे, राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे देखील पिवळ्या टरबूजच्या प्रेमात पडले आहेत.

प्रल्हाद वरे यांनी नुकतीच जयंत पाटील यांची मुंबईत भेट घेवून त्यांना पिवळे कलिंगड दिले. जयंत पाटलांनी स्वत: कापून टरबूजचा स्वाद चाखल्यानंतर त्यांनी या अभिनव प्रयोगाची माहिती व फोटो त्यांच्या ट्विटरवर प्रसिध्द केली आहेत. जयंत पाटलांनी या अभिनव उपक्रमाचे तर कौतुक केलेच पण जे जे नवं ते बारामतीकरांना हव असं म्हणत याबाबतीत बारामतीकरांचा हातखंडा चांगला असल्याचे म्हणत शेतकर्‍याच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.

पिवळे कलिंगड मूळचे तैवानचे

हिरव्या कलिंगडप्रमाणेच हे पिवळे कलिंगड चवीला गोड आहे. याचे मूळ उत्पादन हे तैवान येथे घेतले जाते. असे असले तरी प्रल्हाद वरे हे गेल्या चार वर्षापासून अशा पिवळ्या कलिंगडचे उत्पादन घेत आहेत. जास्त गर, चवीला गोड आणि दिसायला वेगळेच असल्याने याला बाजारभावही अधिकाच मिळत आहे. उत्पादनाबरोबर उत्पन्न वाढवण्याचा शेतकर्‍यांचा प्रयत्न असून यंदा तर पोषक वातावरणामुळे तो साध्य होताना पाहवयास मिळत आहे.

हे पण वाचा :

हे देखील वाचा