पांढरा नव्हे लाल मुळ्यातून घ्या लाखों रुपयांचे उत्पन्न; जाणून घ्या कसे?

red-radish

नाशिक : हिवाळ्याच्या दिवसांमध्ये भरीत, पिठलं, चिकन-मटनासह कोणतीही मसालेभाजी खातांना ताटात लिंबू, कांद्यासह मुळ्याचाही आवर्जून समावेश असतो. मुळा खाणे शरिरासाठी पोष्टीक असल्याने थंडीच्या दिवसात मुळ्याचा वापर अधिक असतो. मुळ्याची भाजी किंवा पिठलं देखील मोठ्या चवीने खाल्लं जातं. आतापर्यंत आपण सर्वजण पांढरा मुळा खात आलो आहोत. मात्र काही प्रगतीशिल शेतकर्‍यांना लालमुळ्याचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. कमी खर्चात जास्त उत्पादन व औषधी गुणधर्म असलेल्या लालमुळ्याला (Benefits of Red Radish Marathi) आता अधिक पसंती मिळू लागली आहे.

लाल मुळामध्ये पांढर्‍या मुळ्यापेक्षा जास्त अँटीऑक्सिटंट्स असतात, ज्यामुळे त्याची मागणी आणि किंमत दोन्ही वाढते. एका हेक्टरमध्ये लागवड केल्यास १३५ क्विंटलपर्यंत उत्पन्न मिळू शकते. लाल मुळा खाण्यासाठी मऊ असतो आणि त्याची चव काहीशी तिखट असते. त्याची पाने गडद रंगाची असतात.

अशी करा पेरणी

लाल मुळा लागवडीसाठी निचरा होणारी शेतजमिन व वाळूची लोम माती असलेले क्षेत्र योग्य मानले जाते. याशिवाय लाल मुळाचे चांगले उत्पादन ही लोम जमीन, चिकनी मातीमध्येही घेता येते. लाल मुळासाठी मातीचे पीएच मूल्य ६.५ ते ७.५ दरम्यान असावे. पेरणीपूर्वी शेत तयार करण्यासाठी ८ ते १० टन शेणखत आणि कंपोस्ट खत संपूर्ण शेतात समान प्रमाणात पसरावे. मग लागवडीची पूर्ण नांगरणी करा. त्यानंतर शेत रोटरून सपाट करावे.

पेरणीसाठी एका हेक्टरमध्ये ८ ते १० किलो बियाणे पुरेसे आहे. प्रत्येक ओळीतील अंतर हे ३० सेंमी आणि पेरणी करताना दोन्ही रोपातील अंतर १० सेंमी ठेवणे गरजेचे आहे. लाल मुळा लागवडीतून चांगले उत्पन्न मिळविण्यासाठी त्यात शेणखत, ८० किलो नायट्रोजन, ६० किलो फॉस्फरस आणि हेक्टरी ६० किलो पोटॅश घाला. योग्य नियोजन आणि व्यवस्थापन केले तर लाल मुळ्यापासून लाखो रुपयांचे उत्पादन घेणे सहज शक्य आहे.

Exit mobile version