मुंबई : शेती करतांना माती परीक्षण करणे फायदेशिर ठरत असते. योग्य माती परीक्षणामुळे उत्पादन वाढीसाठी फायदाच होत असतो. मात्र माती परीक्षणासाठी करावी लागणारी कसरत पाहता बहुतांश शेतकरी यापासून लांबत राहतात. मात्र शेतातच अवघ्या दीड मिनिटात माती परीक्षण करता येणार आहे. यासाठी आयआयटी कानपूरने एक पोर्टेबल किट विकसित केले आहे. या किटच्या मदतीने पाच ग्रॅम मातीचा नमुना घेऊन मोबाईलच्या मदतीने केवळ ९० सेकंदांमध्ये मातीचे आरोग्य तपासता येणार आहे. (Soil testing in 90 sec : Kit by IIT Kanpur)
माती परीक्षणासाठी साधारणपणे १ किलो माती नमुना प्रयोगशाळेमध्ये नेऊन द्यावा लागतो. त्यात अपेक्षित घटकानुसार त्याचे निष्कर्ष मिळण्यासाठी दोन ते सात दिवस लागू शकतात. यामुळे महाराष्ट्रातील बहुतांश शेतकरी माती परीक्षण करण्याच्या फंद्यात पडत नाहीत. शेतकऱ्यांची ही समस्या दूर करण्यासाठी आयआयटी कानपूर येथील संस्थेच्या रसायन अभियांत्रिकी विभागातील जयंत कुमार सिंग, पल्लव प्रिन्स, अशर अहमद, यशस्वी खेमानी आणि महम्मद आमीर खान यांनी एक पोर्टेबल कीट तयार केले आहे.
असे करता येते परीक्षण
परीक्षणाचा निष्कर्ष त्वरित मोबाईलवर प्राप्त होण्यासाठी ‘भू परीक्षक’ हे मोबाईल प तयार केले. या मोबाईल अॅपच्या मदतीने योग्य परीक्षण करता येते. यासाठी केवळ पाच ग्रॅम माती नमुना ५ सेंमी लांबीच्या परीक्षानळीसारख्या दिसणार्या उपकरणामध्ये टाकावे. त्यानंतर हे उपकरण ब्ल्यूटूथद्वारे मोबाईलशी जोडावे. ही प्रक्रिया ९० सेकंदांमध्ये पार पडते. त्यानंतर मोबाईलच्या स्क्रीनवर भू-परीक्षक या विशेष तयार केलेल्या पमध्ये मातीच्या आरोग्याचा अहवाल एकमेव अशा आयडी क्रमांकासह त्वरित उपलब्ध होतो. यात मातीतील नत्र, स्फुरद, पालाश, सेंद्रिय कर्ब यांसह सहा घटकांच्या योग्य प्रमाणांची सविस्तर माहिती देण्यात येते. जर आपण पिकाचा उल्लेख केलेला असल्यास त्या पिकासाठी शिफारशीत खतमात्रा आणि परीक्षणानुसार करायचे बदल यानुसार आपल्या शेतासाठीच्या खत शिफारशी सुचविल्या जातात. त्यानुसार पिकांचे खत व्यवस्थापन केल्यास पिकाचे उत्पादन वाढीसाठी फायदा होऊ शकतो. हे तंत्रज्ञान लवकरच शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.