मुंबई : शेतीमध्ये रासायनिक खते व किटकनाशकांच्या अतिवापरामुळे मानवी आरोग्यावर विपरित परिणाम होतात. यामुळे सेंद्रिय शेतीचा सल्ला दिला जातो. मात्र कमी कालावधीत जास्त उत्पादन येण्यासाठी अनेक घातक रसायनांचा वापर करण्यात येतो. यापैकी दोन किटकनाशके ही मानवी आरोग्यासाठी धोकादायक असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्या विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे. यामध्ये स्ट्रेप्टोमायसिन आणि टेरासायक्लिन यांचा समावेश आहे. टोमॅटो आणि सफरचंदाच्या संरक्षणासाठी या कीटकनाशकांचा वापर केला जात होता. त्यामुळे आता भारतीय कंपन्यांना २०२२ नंतर ही दोन कीटकनाशके विकता येणार नाहीत.
सुरवातीला स्ट्रेप्टोमायसिन आणि टेरासायक्लिन ही दोन्हीही किटकनाशके ही केवळ बटाटा आणि तांदळासाठी वापरण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. पण प्रत्यक्षात टोमॅटो आणि सफरचंद यांसारख्या फळांवर फवारण्यासाठी याचा वापर केला जात होता. या किटकनाशकांच्या फवारणीचा परिणाम मानवी आरोग्यावर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळेच केंद्रीय कीटकनाशक मंडळाने २०२० मध्ये दोन्ही रसायनांवर बंदी घालण्याची मागणी सरकारकडे केली होती. त्यानुसार हा निर्णय झाला आहे. स्ट्रेप्टोमायसिन आणि टेरासायक्लिन नावाच्या कीटकनाशकांच्या आयात आणि उत्पादनावर १ फेब्रुवारी २०२२ पासून बंदी घालण्यात येईल, असे आदेश केंद्र सरकारने दिले आहे.