पुणे : शेती परवडत नाही म्हणून जोडधंदा करण्याचा सल्ला दिला जातो. पशुपालन, कुक्कुटपालन, मस्यपालान आदी जोडव्यवसायांना शेतकऱ्यांना नेहमीच प्राधान्य देण्यात येते. आता यात मधमाशी पालनची जोड पडणार आहे. राज्यात खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मधकेंद्र योजना राबवण्यात येणार आहे. यासाठी इच्छूकांना ग्रामोद्योग मंडळाकडे अर्ज करावा लागणार आहे. प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आलेल्या लाभार्थ्यांना पुणे तसेच मधसंचालनालय महाबळेश्वर येथे मधमाशापालनाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
काय आहेत अटी?
मधमाशी पालनासाठी अर्जदार किमान १० वी पास असणे गरजेचे आहे आणि त्याचे वय हे २१ वर्षापेक्षा अधिक असणे आवश्यक आहे. अर्जदाराच्या नावाने किंवा त्यांच्या कुटूंबातील व्यक्तीच्या नावे किमान एक एकर तरी शेतजमीन असणे आवश्यक आहे. इच्छुकांना या योजनेसाठी अर्ज करावे लागतील. त्यानंतर अर्जांची छाननी होवून प्रशिक्षणार्थींची निवड करण्यात येईल. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर मधमाशीपालन हे करता येणार आहे. हा उद्योग करण्यासाठी खादी व ग्रामोद्योग मंडळाकडून मधपेट्या, मधयंत्र व इतर साहित्यासाठी लागणार्या एकूण रकमेच्या ५० टक्के अनुदान दिले जाणार आहे. तर ५० टक्के रक्कम ही उमेदवारास गुंतवावी लागणार आहे. या केंद्राच्या उभारणीनंतर मधपाळांकडून उत्पादित मध हमी भावाने खरेदीही करता येणार आहे.