पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘झिरो बजेट’ शेतीवर (Zero Budget Farming) भर देत असल्याने आता ‘झिरो बजेट’ शेतीचे महत्व शेवटच्या शेतकर्यांपर्यंत पोहचवण्यासाठी केंद्र सरकारकडून एक यंत्रणा उभारली जात आहे. यामध्ये सर्व कृषी विज्ञान केंद्रांनाही सामावून घेण्यात आले आहे.
आतापर्यंत नैसर्गिक शेतीची केवळ चर्चा झालेली आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच अनुषंगाने भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक यांनी देशभरातील कृषी विद्यापीठांना याबाबत पत्र पाठवले असून कृषी विज्ञान केंद्रांनी नैसर्गिक शेतीबाबत जनजागृती आणि कोणते मार्गदर्शन करावे याबाबत सांगितले आहे.
कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून नैसर्गिक शेती पध्दतीचे प्रयोग आणि थेट प्रात्याक्षिके करुन दाखवली जाणार आहेत. ‘झिरो बजेट’ शेती हा संकल्पना मांडून पूर्ण होणारा उपक्रम नाही. त्यासाठी शेतकर्यांच्या बांधावर जाणे महत्वाचेच आहे. त्यानुसारच सर्व विचार करुन कृषी संशोधन परिषदेने ही जबाबदारी कृषी विज्ञान केंद्रावर सोपवलेली आहे.