पुणे : गत १५ दिवसांपासून राज्यभरात ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस व कडाक्याची थंडी असे संमिश्र वातावरण दिसून येत आहे. या वातावरणाचाा पिकांवर परिणाम होत असल्याने शेतकर्यांनी पीकांची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. अन्यक्षा उत्पादनात घट होवून शेतकर्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावू लागू शकते.
थंडी ही रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी या पिकांसाठी पोषक मानली जाते. मात्र, गेल्या तीन दिवासांपासून वाढलेला गारठा आणि ढगाळ वातावरणाचा प्रतिकूल परिणाम पिकांवर होत आहे. यामुळे फुलगळती, अळीचा प्रादुर्भाव, मर रोग एवढेच नाही तर पिकांची वाढच खुंटली असल्याचे दिसून येत आहे.
असा होतोय पीकांवर परिणाम
गहू : सध्या थंडी आणि ढगाळ हवामान एकत्र असल्याने जेथे वेळेवर पेरणी झालेली आहे, त्या पिकावर तांबेरा रोग आणि मावा किडीचा प्रादुर्भाव वाढू शकतो. कडाक्याची थंडी पाच दिवसांपेक्षा जास्त राहिली तर फुलोरा अवस्थेतील पिकाची वाढ मंदावते.
ज्वारी : जेव्हा तापमान १० अंश सेल्सिअसपेक्षा खाली जाते तेव्हा ज्वारीच्या वाढीवर परिणाम दिसतो. सात ते आठ दिवस कडाक्याची थंडी राहिली तर पोटरीतील कणसे तशीच राहतात.त्याचा उत्पादनावर परिणाम होऊ शकतो.
हरभरा : थंडी आणि ढगाळ हवामान कायम राहिले तर फुलगळीची समस्या दिसून येईल, तसेच घाटेअळीचा प्रादुर्भाव वाढेल. ज्याठिकाणी केवळ थंडीचे वातावरण आहे तेथे पीक वाढीस फायदा होणार आहे.
केळी : थंडीच्या कालावधीत वाढ होत असल्याने बागेमध्ये रात्रीच्या वेळी पाणी द्यावे. तसेच बागेच्या चारीही बाजूने शेकोटी करावी, त्यामुळे काही प्रमाणात तापमान वाढेल. नवीन लागवडीमध्ये नांग्या भरून घ्याव्यात.
द्राक्ष : वाढत्या थंडीमुळे मण्यामध्ये क्रकिंगची समस्या वाढेल. ती आटोक्यात ठेवण्यासाठी पाणी उतरण्यापूर्वीच्या अवस्थेतील बागेमध्ये तज्ज्ञांच्या शिफारशीनुसारच कॅल्शिअम अधिक मॅग्नेशिअमची फवारणी करावी. बागेतील जमीन वाफसा स्थितीमध्ये राहील, याची काळजी घ्यावी. पिंक बेरीची समस्या वाढू नये यासाठी तापमान कमी होताच ठिकठिकाणी शेकोट्या पेटवाव्यात, पाणी द्यावे. घड पेपरने झाकावेत. थंडी वाढल्यास मण्यांचा आकार वाढण्यात अडचणी येतील. त्यासाठी बोदावर आच्छादन महत्त्वाचे आहे. त्यासोबत मुळे कार्यरत राहील, यासाठी उपाययोजना कराव्यात.
डाळिंब : सध्या थंडीमध्ये वाढ झालेली असून तापमान २५ अंश सेल्सिअसपेक्षा कमी आहे. अशा ठिकाणी नवीन बहार पकडलेला असल्यास फुले येण्यामध्ये समस्या होऊ शकतात. दिवस आणि रात्रीच्या तापमानातील वाढत्या फरकामुळे फळे तडकण्याचे (क्रॅकिंग) प्रमाण वाढू शकते. क्रॅकिंग टाळण्यासाठी बागेत पाणी देण्याचे योग्य नियोजन करावे. एकाच वेळी जास्त पाणी देण्यापेक्षा रोज थोडे थोडे आणि संध्याकाळी चारनंतर पाणी द्यावे. यामुळे बागेत आर्द्रतेचे प्रमाण योग्य राहून थंडी कमी राहण्यास मदत होते.
काय आहे उपाययोजना?
हरभरा पिकावर घाटीअळीचा धोका आहे. त्यामुळे शेतकर्यांनी एका एकरामध्ये ३ ते ४ टी आकाराचे सापळे लावणे महत्वाचे आहे. यामध्ये किड साठली जाऊन नंतर ती नष्ट करणे महत्वाचे आहे.
असे करा मर रोगाचे व्यवस्थापन
मर रोगाचे व्यवस्थापन करण्यासाठी शेताजवळ, बांधावर पहाटेच्या वेळी मध्यम ओलसर पालापाचोळा, कोरडे तण, सुकलेले लाकूड आधी हवेच्या प्रवाहाच्या उलट दिशेलापेटवून धूर करावा. त्यात दगडी कोळसा टाकून धूर व उष्णता रात्रभर राहील असे पाहावे. ज्या दिवशी धुके पडण्याची शक्यता असेल त्या दिवशी पाण्यात विरघळणार्या गंधक पावडरीची ४० ग्रॅम प्रति १५ लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करणे महत्वाचे आहे.